Friday, October 4, 2013

दुःख मोठंच आहे, पण त्यांना न भेटल्याचं...

अनुराधा पोतदार गेल्याचे कळल्यापासून खूप अस्वस्थ आहे. ........
 
वास्तविक अलीकडं आमचा संबंधही आला नाही, पण काही लोकांशी एक अनामिक नातं जुळतं तसं माझं झालं होतं. बाईंच्या बाजूनं ते असेलच असं नाही. पण माझ्या बाजूनं नक्कीच होतं. 
त्यांच्याकडं रुढार्थानं कधी शिकायला नव्हते. त्या एस. पी. त शिकवायच्या, तेव्हा मी गरवारेमधून मराठी बी. ए. केलं. तेव्हा तर त्यांचा - माझा परिचयही नव्हता. नंतर नोकरी करताना रविवारच्या पानांची जबाबदारी माझ्याकडं होती. एकदा काही पुस्तकं त्यांच्याकडं परीक्षणासाठी पाठवायचं ठरलं, तेव्हा बाईंना फोन केला. ती त्यांची आणि माझी पहिली भेट. थोडा घाबरतच फोन केला, एवढी मोठी लेखिका.. पण पलीकडून अतिशय शांत, मृदू आवाजात त्या आपुलकीनं बोलत होत्या. 
पुढं असंच कधी लेखाच्या, कवितेच्या कधी पुस्तकाच्या निमित्तानं बोलत होतो. भेटलो कधीच नाही, त्या खूपदा म्हणाल्या भेटायला ये, पण राहून गेलं. काही वर्षांनी माझं काम बदललं आणि बाईंबरोबरच्या फोन-भेटीही थंडावत, नंतर बंद झाल्या.

काय नातं होतं, त्यांचं आणि माझं? माहिती नाही, पण मला त्यांच्याकडून खूप काही मिळालं. 
माझं काम बदलल्यानंतर बरेच दिवसांनी त्यांचा मला फोन आला, अगं कुठं असतेस, काय चालंलंय, फोन केला नाहीस.. वगैरे. तेव्हा वेळ मारून नेली, पण या मोठ्या लोकांना बिनकामाचे फोन करून त्यांना डिस्टर्ब करायला नको असं वाटायचं, अजूनही वाटतं. त्यामुळं मनात असूनही त्यांच्याशी संपर्क साधला जात नाही. या संकोची स्वभावामुळं खूप चांगल्या चांगल्या लोकांशी मी संपर्कच साधेनाशी झाले. 
राम कदम, प्रभाकर पेंढारकर, दि. पु. चित्रे.. कितीतरी नावं घेता येतील. चित्रे आमच्याकडे सदर लिहायचे, तेव्हा त्यांच्याशी बोलणं व्हायचं, मस्त गप्पा मारायचे.. इतक्या ज्युनियर मुलीबरोबर बोलतोय, असं त्यांनी मला कधीही जाणवू दिलं नाही. सदर संपल्यावर माझ्याकडून पुन्हा संपर्क बंद. एकदा एका कार्यक्रमात भेटले, म्हणाले फोन का करत नाहीस बरं वाटतं तुम्हा लोकांशी बोलल्यावर. माझा विश्वासच बसेना... असो. 

विषय माझा मोठेपणा सांगण्याचा नाही, तर आपण काही ग्रह करतो, त्यांचा वेळ कशाला घ्यायचा असा संकोच बाळगतो, संपर्क टाळतो आणि खूप चांगल्या अनुभवांना मुकतो. ती माणसेच या जगातून गेल्यावर वाटतं, अरे कशासाठी आपण एवढा संकोच बाळगला.. 
पोतदारबाई गेल्याचं दुःख मोठंच आहे, पण त्यांना न भेटल्याचं, त्यांच्याशी संपर्क न ठेवल्याचं दुःख अधिक आहे. पण यातून खरंच मी काही शिकू शकेन का? बघू या.. फक्त त्यावेळी वेळ हातात असायला हवी...
 
-ऋता बावडेकर, पुणे
 
 

Wednesday, February 13, 2013

मुलींचेच नाच-गाणे आक्षेपार्ह का..?

जेमतेम दहावीतल्या तीन मुलींनी आपला "ऑल गर्ल्स रॉक बॅंड' सुरू केला, तेही काश्‍मीर खोऱ्यात. केवळ मुलग्यांचे बॅंड असलेल्या स्पर्धेत तिसरा क्रमांकही मिळवला. ठिकठिकाणी कार्यक्रम होऊ लागले आणि त्याबरोबरच धमक्‍यांचे सत्रही सुरू झाले. पाठोपाठ मुफ्तींचा फतवा निघाला. मुलींचे हे "नाच-गाणे' त्यांना मान्य नव्हते. या सगळ्या प्रकारामुळे मुलींनी आपला बॅंड बंद करण्याचा निर्णय घेतला. असल्या शोकांतिका आपल्या देशाला नवीन नसल्या तरी हे प्रकार कधी तरी थांबणार का, असा प्रश्‍न पडतोच. 

 

ड्रमर फराह दीबा, गिटारिस्ट अनिका खालिद आणि गायिका-गिटारिस्ट नोमा नझीर या दहावीतल्या मुलींनी डिसेंबरमध्ये "प्रगाश' हा आपला "ऑल गर्ल्स रॉक बॅंड' सुरू केला.. आणि बघता बघता "बॅटल ऑफ बॅंड्‌स' या संगीत स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेत त्यांचे सगळे स्पर्धक "ऑल बॉय रॉक बॅंड्‌स' होते. काश्‍मीर खोऱ्यात हे प्रथमच घडत होते. अल्पावधीतच या मुलींना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला... आणि तिथेच गडबड झाली. त्यांना ऑनलाइन धमक्‍या सुरू झाल्या. हे कमी होते म्हणून की काय, "या मुलींनी हे नाच-गाणे थांबवावे. ते इस्लामला मान्य नाही. आपापल्या घरात, आपल्या कुटुंबीयांना आपली ही कला त्यांनी दाखवावी,' असा फतवा महामुफ्ती बशीर उद्दीन यांनी काढला. या छोट्या मुली हे सगळे दडपण किती काळ सहन करणार? अखेर ४ फेब्रुवारी २०१३ रोजी आपला बॅंड बंद केल्याचे त्यांनी जाहीर केले. एवढेच नव्हे, तर या मुलींपैकी एकीला या प्रकारामुळे डिप्रेशन आले. तिला बंगळूरला हलविण्यात आले आहे. तिच्या व इतर मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा ठावठिकाणा गुप्त ठेवण्यात आला आहे.

बॅंड बंद करणे, हा मूलतत्त्ववाद्यांना आपला विजय वाटेल (बंड बंद केल्याबद्दल मुफ्तींनी समाधान व्यक्त केले आहे), कोणाला ही शोकांतिका वाटेल, तर कोणाला ही शांतता प्रस्थापित करणारी कृतीही वाटू शकेल. "माणूस तितक्‍या प्रकृती' या न्यायाने प्रत्येक जण या घटनेचा अर्थ लावून कधी सुस्कारून, तर कधी फुत्कारून आपल्या मनाची समजूत काढेल आणि कालांतराने ही घटना विसरून जाईल. पण या मुलींचे काय? त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या मेंटॉरचे- अदनान मट्टूचे काय? त्यांच्या कुटुंबीयांचे काय? "अंधारातून प्रकाशाकडे' असा अतिशय आशावादी अर्थ असलेल्या "प्रगाश' या बॅंडला आणि परिणामी या मुलींना इतक्‍या लहान वयातच निराशावादी, उद्विग्न करणाऱ्या वास्तवाला तोंड द्यावे लागले. का? या "का'चे उत्तर आपल्या समाज व्यवस्थेत कधी तरी कोणाला तरी मिळेल का?

स्पर्धेनंतर "प्रगाश'चा एक कार्यक्रम श्रीनगरमध्ये झाला आणि या मुलींना त्यांच्या फेसबुक पेजवर धमकीवजा, अश्‍लील मेसेजेस येऊ लागले. अगदी बलात्काराच्याही धमक्‍या आल्या. तरी मुली खचल्या नाहीत. काही दिवस बॅंडचे जाहीर कार्यक्रम बंद ठेवावेत आणि म्युझिक अल्बम्स काढावेत, असे त्यांनी ठरविले. पण रविवारी (ता. ३फेब्रुवारी २०१३) मुफ्तींनी या तथाकथित नाच-गाण्याच्या विरोधात फतवा काढला. यामुळे आतापर्यंत क्षीण स्वरूपात असलेल्या अज्ञात, अनामिकांच्या विरोधाला धार चढू लागली. पाठोपाठ "जमात-ए-इस्लामी'नेही या विरोधात आपला सूर मिसळला... "अशा प्रकारच्या असभ्य कृतीला; विशेषतः परक्‍या पुरुषांसमोर स्त्रियांनी नाच-गाणे करण्याला शरियत कधीही परवानगी देत नाही. याचे उल्लंघन करणारा मोठ्या शिक्षेस प्राप्त ठरतो, याची इतर अनेकांप्रमाणे या मुलींना व त्यांच्या पालकांना जाणीव नसावी,' असे त्यांच्या प्रवक्‍त्याचे म्हणणे आहे. वयाने लहान असल्या तरी या सगळ्या घटनांचा अर्थ मुलींना बरोबर समजला. त्यांनी आपल्या आवडीला मुरड घालण्याचे ठरवले आणि काश्‍मीर खोऱ्यातला पहिला वहिला महिलांचा बॅंड बंद केला. या सगळ्या प्रकारावर एका नेटिझनने मार्मिक प्रश्‍न या तथाकथित धर्मरक्षकांना विचारला आहे, "मुलींच्या बॅंडला परवानगी नसेल, तर तसेच नाच-गाणे करणारा मुलांचा बॅंड कसा चालतो?' अर्थातच या प्रश्‍नाचे उत्तर या मूलतत्त्ववाद्यांकडे सोडाच; पण इतरही कोणाकडे नाही. या देशातील महिलांचे हेच तर फार मोठे दुर्दैव आहे.

त्याचवेळी मनात येते, कलेला धर्म असतो? तसे असेल, तर आतापर्यंत आणि अजूनही जे मुस्लिम नामवंत, काही तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत (पुरुष व महिला दोन्हीही) होऊन गेले, आत्ता घडत आहेत, त्यांचे काय? त्यांना पण हाच न्याय लावणार? नाही. कारण या मुलींना धमकावणे तुलनेने सोपे आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. फतव्याचा, धमक्‍यांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून "मूठभर लोकांच्या धमक्‍यांना घाबरून मुलींनी आपला बॅंड बंद करू नये, असेच गात राहावे,' असे आवाहन केले आहे. पण मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी काय पावले उचलली, हे कळू शकले नाही. दरम्यान, संपूर्ण देशात या घटनेची चर्चा सुरू झाली. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने या घटनेचा निषेध केला. ऑनलाइन प्रचंड प्रतिसाद मिळाला. यामुळे म्हणा किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे म्हणा चक्रे फिरली. "प्रगाश'च्या फेसबुक पेजवर धमकीचे मेसेजेस पाठविणाऱ्यांविरुद्ध जम्मू-काश्‍मीर खोऱ्यातील राजबाग पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला. सायबर क्राइम सेलच्या मदतीने आतापर्यंत सहा जणांना ओळखण्यात पोलिसांना यश आले आहे. येत्या काही दिवसांत काहींना अटक होण्याचीही शक्‍यता आहे.

दरम्यान, सईद अली शाह गिलानी यांच्या नेतृत्वाखालील "हुरियत'ने मुफ्तींच्या फतव्याचा निषेध केला आहे. ते म्हणतात, "या मुलींना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. कोणीही तशा धमक्‍या दिलेल्या नाहीत. हे सगळे प्रसार माध्यमांचे काम आहे. काश्‍मिरी जनतेला बदनाम करण्यासाठी एका सामान्य गोष्टीला त्यांनी एवढे मोठे रूप दिले आहे. काही तरुण मुलांनी सोशल नेटवर्किंगवर काही अश्‍लील लिहिले म्हणजे त्या धमक्‍या होत नाहीत. मात्र, "हुरियत'चा या कुठल्याही प्रकाराला अजिबात पाठिंबा नाही.' पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. मात्र या प्रकरणाचे नकारात्मक चित्रण केल्याबद्दल त्यांनीही माध्यमांवरच खापर फोडले आहे.

राजकीय नेते, संघटना या घटनेचा आपल्याला हवा तसा अर्थ लावणार, आपल्या व्यक्तिगत किंवा राजकीय स्वार्थासाठी त्याचा उपयोग करून घेणार, पण या किशोरवयीन मुलींचे काय? त्यांच्या भावविश्‍वाचे काय? ज्या क्षेत्रात कदाचित त्यांनी करिअर करायचे ठरविले असेल, त्या स्वप्नांचाच कोणीतरी आपल्या स्वार्थासाठी, आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चुराडा केला आहे. आपण काय करावे, हे मूठभर मूर्ख लोक कोण ठरवणार, असा प्रश्‍न त्यांना नक्कीच पडला असणार. पण त्याचे उत्तर त्या कोणाकडे मागणार? आणि मागितले तरी त्यांना ते मिळणार का? कारण कमल हसनच्या "विश्‍वरूप'चा वाद असो, आशिष नंदी यांच्या विधानावरील वाद असो किंवा अशा प्रकारची अन्य कोणतीही घटना असो; विचाराला विचारानेच उत्तर द्यावे- हे एकतर आपण विसरून गेलो आहोत, ते आपल्याला माहितीच नाही किंवा हे काम खूप क्‍लिष्ट- बुद्धीला चालना देणारे आहे. त्यापेक्षा गुंडगिरी करून, धाकदपटशा दाखवून दहशत पसरविणे आपल्याला सोपे वाटू लागले आहे.

या प्रकारात नकारात्मक गोष्टी खूप आहेत. किंबहुना त्याच अधिक आहेत. पण आशेचा किरण वाटावा अशाही काही गोष्टी नक्कीच आहेत. या प्रकाराबाबत तरुण पिढीने सकारात्मक भूमिका बजावली. सोशल नेटवर्किंगचा खूप चांगला उपयोग त्यांनी परिणामकारक केला. "देवा, आमच्या देशबांधवांना मोठे मन दे, त्याची अत्यंत गरज आहे', "मूठभर लोकांची ही अरेरावी असली, तरी त्याचे परिणाम खूप मोठ्या जनमानसावर होतात, त्यामुळे ही अरेरावी वेळच्या वेळीच थांबवायला हवी', "एवढ्या मोठ्या समाजाचे भवितव्य ही चार-दोन मंडळी कशी ठरवणार? हा हक्क त्यांना कोणी दिला?' अशा कितीतरी प्रतिक्रिया- प्रश्‍न ऑनलाइन बघायला मिळतात. सगळेच काही संपलेले नाही, यातूनच उद्या काही चांगले घडू शकेल. त्याप्रमाणेच, आज "प्रगाश'चा प्रवास थांबलेला वाटत असला, तरी नवीन पिढीतल्या या मुली आपल्याच पिढीतील या इतर मुलांप्रमाणे उद्या कदाचित आपल्या हक्कासाठी पुन्हा उभ्या राहतील. कोणी सांगावे, "प्रगाश'चा हा आज अंधारात थांबलेला प्रवास उद्याच्या प्रकाशात पुन्हा सुरू होईल.. एका शाश्‍वताच्या दिशेने... ठामपणे! समाजाने त्यांच्या दिशेने आज पुढे केलेला हात त्या वेळीही असाच पुढे असू द्यावा इतकेच...




-ऋता बावडेकर, पुणे
ruta.bawdekar@gmail.com
( साप्ताहिक सकाळच्या सौजन्याने)