Friday, October 4, 2013

दुःख मोठंच आहे, पण त्यांना न भेटल्याचं...

अनुराधा पोतदार गेल्याचे कळल्यापासून खूप अस्वस्थ आहे. ........
 
वास्तविक अलीकडं आमचा संबंधही आला नाही, पण काही लोकांशी एक अनामिक नातं जुळतं तसं माझं झालं होतं. बाईंच्या बाजूनं ते असेलच असं नाही. पण माझ्या बाजूनं नक्कीच होतं. 
त्यांच्याकडं रुढार्थानं कधी शिकायला नव्हते. त्या एस. पी. त शिकवायच्या, तेव्हा मी गरवारेमधून मराठी बी. ए. केलं. तेव्हा तर त्यांचा - माझा परिचयही नव्हता. नंतर नोकरी करताना रविवारच्या पानांची जबाबदारी माझ्याकडं होती. एकदा काही पुस्तकं त्यांच्याकडं परीक्षणासाठी पाठवायचं ठरलं, तेव्हा बाईंना फोन केला. ती त्यांची आणि माझी पहिली भेट. थोडा घाबरतच फोन केला, एवढी मोठी लेखिका.. पण पलीकडून अतिशय शांत, मृदू आवाजात त्या आपुलकीनं बोलत होत्या. 
पुढं असंच कधी लेखाच्या, कवितेच्या कधी पुस्तकाच्या निमित्तानं बोलत होतो. भेटलो कधीच नाही, त्या खूपदा म्हणाल्या भेटायला ये, पण राहून गेलं. काही वर्षांनी माझं काम बदललं आणि बाईंबरोबरच्या फोन-भेटीही थंडावत, नंतर बंद झाल्या.

काय नातं होतं, त्यांचं आणि माझं? माहिती नाही, पण मला त्यांच्याकडून खूप काही मिळालं. 
माझं काम बदलल्यानंतर बरेच दिवसांनी त्यांचा मला फोन आला, अगं कुठं असतेस, काय चालंलंय, फोन केला नाहीस.. वगैरे. तेव्हा वेळ मारून नेली, पण या मोठ्या लोकांना बिनकामाचे फोन करून त्यांना डिस्टर्ब करायला नको असं वाटायचं, अजूनही वाटतं. त्यामुळं मनात असूनही त्यांच्याशी संपर्क साधला जात नाही. या संकोची स्वभावामुळं खूप चांगल्या चांगल्या लोकांशी मी संपर्कच साधेनाशी झाले. 
राम कदम, प्रभाकर पेंढारकर, दि. पु. चित्रे.. कितीतरी नावं घेता येतील. चित्रे आमच्याकडे सदर लिहायचे, तेव्हा त्यांच्याशी बोलणं व्हायचं, मस्त गप्पा मारायचे.. इतक्या ज्युनियर मुलीबरोबर बोलतोय, असं त्यांनी मला कधीही जाणवू दिलं नाही. सदर संपल्यावर माझ्याकडून पुन्हा संपर्क बंद. एकदा एका कार्यक्रमात भेटले, म्हणाले फोन का करत नाहीस बरं वाटतं तुम्हा लोकांशी बोलल्यावर. माझा विश्वासच बसेना... असो. 

विषय माझा मोठेपणा सांगण्याचा नाही, तर आपण काही ग्रह करतो, त्यांचा वेळ कशाला घ्यायचा असा संकोच बाळगतो, संपर्क टाळतो आणि खूप चांगल्या अनुभवांना मुकतो. ती माणसेच या जगातून गेल्यावर वाटतं, अरे कशासाठी आपण एवढा संकोच बाळगला.. 
पोतदारबाई गेल्याचं दुःख मोठंच आहे, पण त्यांना न भेटल्याचं, त्यांच्याशी संपर्क न ठेवल्याचं दुःख अधिक आहे. पण यातून खरंच मी काही शिकू शकेन का? बघू या.. फक्त त्यावेळी वेळ हातात असायला हवी...
 
-ऋता बावडेकर, पुणे
 
 

No comments:

Post a Comment